"आई"
आई शिवाय सगळ कमी आहे..!!
ती होती म्हणूनच मी आहे..!!
प्रकाशात ती दिव्याची वात आहे,
निजेसाठी लख्ख रात आहे,
कुशीत नीजणा-या पोरासाठी
हवी हवीशी कात आहे..!!
थरथरणा-या माझ्या बाहुंना
आधार देणारी ती नेहमी आहे..!!
ती जपते वेली सारखी,
रातीच्या सावली सारखी,
भुकेच्या वादळात
पेटलेल्या चुली सारखी..!!
तीच्या हातच्या पाण्यातही
पोट भरण्याची हमी आहे..!!
ती जन्माची शिदोरी,
जसे स्वप्न राम प्रहरी,
भविष्याच्या लालीत लपलेले
मायेचे किरण सोनेरी…!!
काट्यांच्या मैदानांत जणु
पायवात कुसुमी आहे.!!
ती देते साथ हवीशी,
बंद मार्गात वाट नवीशी,
कटु अनुभवाच्या जगात सुद्धा
गोड गोड लागणा-या चवीशी…!!
ती आहे बाधांप्रमाणे म्हणून
उजाड रान सुद्धा कर्मभूमी आहे…!!
(माझ्या "नाती-गोती" या नियोजित (?) काव्य संग्रहासाठी लिहलेली कविता..)

No comments:
Post a Comment