Friday, 2 June 2017

सहिष्णू अकबर (भाग-2)





सहिष्णू अकबर (भाग-2)

"अल्ला हु अकबर : الله أكبر "

बाबराच्या वेळे पासून हिंदुस्थानात मुस्लिम राज्यकर्ते रयतेवर धर्माच्या बाबतीत जुलूम करण्यास आपणास अधिकार नाही असे समजु लागले. (@1) अफगान व मोगल यांच्यातील मतभेदामुळे मोगलांनी हिंदु लोकांशी स्नेह वाढविल्याचे दिसून येते. मोगल हे नांवाचे मुसलमान होते. ते सोयीनुसार शिया किंवा सुनी पंथ स्विकारत. बाबर आपला मुलगा हुमायून यांस पाठविलेल्या आज्ञापत्रात म्हणतो, "शिया व सुनी यांचे कलहात लक्ष घालुं नकोस, नाही तर इस्लामालाच कमीपणा येईल." सांगण्याचा उद्देश इतकाच की शिया व सुनी यांच्या वादाचा व मुसलमान धर्मातील तत्कालीन परिस्थितीत होणा-या बदलाचा जवळचा संबंध आहे. तसे पाहिल्यास हुमायूनने शिया पंथ स्विकारला होता. अकबराची आई हमिदा बानू ही एक धार्मिक सुफी शिया परिवारातील होती. अकबराच्या दरबारातील मुस्लिम धर्मगुरु, कायदेतज्ञ हे सुनी असुन ते मुस्लिम धर्माबाबत फार हट्टवादी व परंपरावादी होते. मात्र धर्मसंबंधात मोगल लोक दुराग्रही नव्हते अकबरही धर्माच्या बाबतीत बेपरवा होता, मुसलमानाची कडक श्रध्दा त्याच्यामध्ये कधीच दिसून आली नाही.


अकबराने आपल्या दरबारात धर्मचर्चांना सुरुवात केली होती. हिंदु, जैन, ख्रिश्चन,यहुदी, सेबियन आणि झोराष्ट्री अशा सर्व धर्मांच्या लोकांना तो आमंत्रण देवून चर्चेद्वारे सर्व धर्मांची मुलतत्वे तपासून चांगल्या गोष्टी शोधून काढाव्यात हा त्याचा हेतू होता. इ.स. 1578 ला भरलेल्या चर्चेत "शिया आणि सुनी पंथातील भेद किंवा इस्लामी कायदेपंडीतातील वाद या पासून सुरु झाली व इस्लामच्या मुल तत्वावरच येथे टिका होवू लागली" सदर चर्चेत कुराण ईश्वरप्रणित आहे किंवा खोटे, महंमद ईश्वराचा प्रेषित होता किंवा नाही. इथे पर्यंत उवापोह होवु लागला. (@2) त्यामुळे सनातनी उलेमांचे धाबे दणाणुन गेले. अकबराचे शासन मुसलमानी असल्याने उलेमांचे मत घेतल्या शिवाय बादशाहस कोणताही मोठा न्याय देता येत नव्हता. न्यायाधीश, कायदेपंडीत वगैरे जागा ह्या उलेमांस देण्यात आल्या होता. आग्र्याचे उलेमा दुराग्रही सुनी पंथाचे असल्याने राज्यकारभारात धर्म संघर्ष जाणवू लागला. हिंदुस्थानात शिया व सुफी पंथाचा मोड करण्यासाठी, अकबरास आपल्या मुठीत ठेवण्याचे प्रयत्न उलेमांनी चालविले. (@1) काळाच्या ओघात अकबर मुस्लिम धर्मातील दोष उघडपणे काडु लागला. त्याची सुनी पंथावरील श्रध्दा उडाली. धर्मकलाचा निकाला देण्यासाठी आपणच धर्मगुरु व्हावे अशी अकबराची इच्छा होवु लागली. तेव्हा त्यांने कुराणातील वचनास अनुसरुन धर्मात नविन फेरफार करण्याचा अधिकार बादशास आहे असा करारनामा उलेमां कडून लिहुन घेतला.


अकबराने कुराणाच्या नावाखाली स्वतःच्या मनाप्रमाणे राज्यकारभार करण्यास सुरुवात केली. उलेमा, धर्म पंडीतांना ही गोष्ट आवडली नाही. उलेमांचा अधिकार नाहीसा झाला. अबुल फजल यांने तर "अकबर हा बारावा इमाम होय; जगाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वरांनेच हा अवतार घेतला आहे" असे जाहिर केले. (@1) अकबर उघडपणे पैगंबराबद्दल अविश्वास दाखवू लागला. (कृपया अधिक माहितीसाठी मुसलमाणी रियासत भाग-2 (पृष्ठ क्र. 94-95) पहा) नंतरच्या काळात राजा हा ईश्वरी अंश आहे ही अबुल फजलची कल्पना अकबराने घेतली. अकबराने स्वतःला "King of Islam, Amir of the faithful, shadow of God on the earth" घोषीत केले. (@3) आपल्या नाण्यांवरती "अल्ला-हु-अकबर" ही अक्षरे लिहुन घेवून ती नाणी लोकांमध्ये दान म्हणून वाटली जात असत. जसे हिंदु धर्मात "हर हर महादेव" ही पवित्र घोषणा आहे तशीच मुस्लिम धर्मात "अल्ला-हु-अकबर" या घोषणेला अनन्य साधारण महत्व आहे. या घोषणेच्या रुपाने अकबराने स्वतःला अल्लाह म्हणून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, कारण अल्ला-हु-अकबर याचे दोन अर्थ निघतात एक पारंपारीक अर्थ अल्लाह महान आहे असा आहे, व दुसरा "अकबरच अल्लाह आहे" होता. अकबराने अकबरच अल्लाह आहे या अर्थाने त्या घोषणेचा वापर केला. याद्वारे हे सुचित होते की, ही घोषणा म्हणजे अकबराची मुस्लिम धर्मावरील कमी होणारी श्रध्दा यातून प्रतित होते.

(इतिहासाच्या पाऊलखुणा या ग्रुप करीता #मुसलमानी_रियासत या हॅश टॅग अंतर्गत लिहलेली लेख मालिका)

No comments:

Post a Comment