Friday, 2 June 2017

गोवध


"गोवध"

गाय ही हिंदुंसाठी पवित्र व आस्थेशी संबंधीत असणारा प्राणी होय. पेशव्यांच्य रोजनिशीतील 'गोवध' या गुन्ह्यासाठी दिलेल्या शिक्षेवरुन या गुन्ह्याच गंभीर स्वरुप कळून येते. तीन प्रकरणात दिलेल्या वेगवेगळ्या शिक्षांचा उल्लेख इथे करावासा वाटतो. एका प्रकरणात जमीन जप्त करुन तीची विक्री केल्याली दिसते, दुस-या प्रकरणात 3 आरोंपीचे उजवे हात तोडून सोडून देण्यात आले. (@1) तर तीस-या प्रकरणात किल्ल्यावर पक्के बंदोबस्तात अटकेत ठेवून पोटास शेर दररोज देऊन चुना मळण्याचे काम घेत जाणे असा आदेश दिलेला दिसतो. (@2)

निकोलाव मनुची हा इटालियन प्रवासी होता. हिंदुस्थानात आल्यावर तो दाराच्या पदरी तोफखान्यावर अधिकारी होता. त्याने भारतातील आपल्या 50 वर्षाच्या अनुभवांवर आधारीत "Storia Do Mogor" हे पुस्तक लिहले आहे. (@3) त्यात तो म्हणतो की, सुरत मध्ये पारशी लोकांची एक जमात आहे. पर्शियाच्या शहाने त्यांना सक्तीने मुसलमान करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी सुरतच्या हिंदु राजाकडे निरोप पाठवून देशात प्रवेश करु देण्याची विनंती केली. तेव्हा हिंदु राजाने त्यांना गोवध करणार नाही आणि गोमास खाणार नाही या अटीवर त्यांना राज्यात प्रवेश करण्याची परवानगी दिली. (@3)

हिंदु धर्मवृध्दीचे शिवाजी महाराजांचे प्रयत्न पेशव्यांनी स्वीकारुन अखेर पर्यंत आपल्या नजरे समोर ठेवले. हिंदुंना गाय ही पवित्र असल्याने गोवध मनाईचे फर्मान बादशहा पासून दि. 04.09.1789 रोजी महादजी शिंदे यांनी मिळवले, सर्व प्रांतिक अंमलदारास जाहीर केले. त्याचा मराठी तर्जुमा #मुसलमानी_रियासत भाग -2 मध्ये सरदेसाई यांनी दिलेला असून तो खाली देत आहे. आरंभी प्रस्ताव व पुढे फर्मान असे त्याच स्वरुप आहे.

'एकदां अकबर बादशहाने समस्त इस्लामी विद्वानाची सभा भरवून प्रश्न केला की, आपल्या सेवेशी माझी एक प्रार्थना आहे. कृपा करुन मला असें विदित करा की, हजरत पैगंबराच्या हादीमध्ये (हदीस ?) बैल अगर दुभती गाय यांच्या संबंधाने काय आज्ञा दाखले आहेत ? त्यावरुन मौलवी कुत्बुद्दीन पीरशहा आणि मौलवी साबीरबक्ष यांनी हादीतील वचम काढून दाखविलें ते असेः- चार इसम पापकर्मे म्हणून समजावे, एक पिपळाचे किंवा बोरीचे हिरवे झाड कापणारा, दुसरा मनुष्य-विक्रय करणारा, तिसरा गाईचा वध करणारा, आणि चौथा व्यभिचार करणारा. हे चार इसम निःसंशय नरकास पोचतात. ही गोष्ट कुराणांत सुध्दां स्पष्ट शब्दांनी प्रमाण मानिलेली आहे. त्यासंबंधाने कुराणांत वचन असून त्यावर पैगंबर रसूलने बनविलेले नियमही आहेत. यावरुन गोवधाचे बाबतींत परमेश्वराची सर्वथा मनाई आहे, याविषयी संशय नाही. (या फतव्याचे खाली मौलवींच्या सही व साक्षी आहेत.) वरील वचनाचीच नक्कल बादशहा शहाआलम गाजीच्या राजचिन्हांकित फर्मानांत दाखल असून ते छ 13 जिल्हेज स. 31 (4-9-1789) रोजी प्रसिध्द झाले, ते येणेंप्रमाणेः-

"समस्त राज्यप्रबन्धक, खिलाफतचे कार्यकर्ते, तसेच बादशहाच्या कृपेस पात्र असे अमीर व परगणानिहायचे शासक आणि प्रातोप्रांतीचे कारभारी व जबाबदार अधिकारी या सर्वांस कळविण्यांत येतें की, बादशहाच्या कारभारांत व मालिकगिरींत स्वामींची आज्ञा म्हणून मुबारिक फर्मानाचे पालन आवश्य करण्यांत यावें, आणि सर्वांनी स्पष्ट ध्यानांत बाळगावे की, पशू सुध्दां विधात्याच्या सृष्टीतले जीव असून ते निरुपयोगी होत असें समजूं नये. त्यांतही विशेषतः बैल व गाय हे प्राणी अगणित लाभ देणारे आहेत. कारण मनुष्य व पशू या दोघाचही जीवन धान्याच्या पैदाशीवर अवलंबून असून, गाय व बैल याच्याशिवाय शेतीचे काम बिलकुल साध्य होणार नाही मेहनतीशिवाय खेती नाही. आणि मेहनतीस तर बैलाचे साह्य अवश्य पाहिजे यास्तव जनतेचा संसार व निर्वाह चालण्यास गाईची अत्यत जरुर आहे, आणि गाईवरच मनुष्याचे व पशुंचे जीवन अवलंबून आहे यास्तव आमचे प्रिय पुत्र महाराजाधिराज माधवराव सिधिया बहादुर यानी आमचेकडे विनंति केली, त्यावरुन आम्ही आपल्या उदार अंत करणाने व हर्षपूर्ण दृष्टीने आमच्या समस्त राज्यभूमीमध्ये गोकुशाचा म्हणजे गोहत्येचा परिपाठ सर्वयैव मना करीत आहो या आमच्या फर्मानाचा अंमल इतउत्तर राज्यातील समस्त अधिका-यांनी सावधगिरीने प्रयत्नपूर्वक करुन ही आज्ञा पाळीत जावी, की जेणे करुन कोणतेही नगर, कसबा, गाव यात गोहत्येचे नाव सुध्दा दिसूं नये इतक्या उपर जर कोणी इसम या आज्ञेच्या विरुध्द वागून गोवधाच्या पापात लिप्त होईल, तर तो बादशहाच्या कोपास पात्र होऊन दंड पावेल."

(@1) सातारकर महाराज व पेशवे ह्यांची रोजनिशी भाग 8 वा - सवाई माधवराव पेशवे अंक 3 रा
(@2) सातारकर राजे व पेशवे ह्यांच्या रोजनिशींतील निवडक उतारे भाग 7 वा - माधवराव बल्लाळ उर्फ थोरले माधवराव पेशवे भाग 2 रा
(@3) असे होते मोगल = निकोलाव मनुची (अनुवादक - श्री. ज. स. चौबळ)
(@4) मुसलमानी रियासत - भाग 2 = गोविंद सखाराम सरदेसाई

#YESWEWILLWIN
#MUKESHVADIYAR #MUKESHVDEAR
(इतिहासाच्या पाऊलखुणा या ग्रुप करीता #मुसलमानी_रियासत या हॅश टॅग अंतर्गत लिहलेला लेखा)

No comments:

Post a Comment