सहिष्णू अकबर (भाग-1)"अकबर व हिंदु धर्म"
जल्लाउद्दीन महमद अकबर याचा जन्म इ.स. 1542 ला सिंधमधील अमरकोट या गावी राणा विरिसाल यांच्या घरी झाला. (@1) इतिहासात हिंदुस्थानचा श्रेष्ठ सम्राट म्हणून गणला गेलेला अकबराचा जन्म हा वडीलाच्या वनवासाच्या काळात झाला. हुमायून व इराणी वंशाची हमीदा यांचा विवाह इ.स. 1541 ला झाला खरा परंतु हुमायूनच्या भावाचा त्यांस विरोध होता. आपल्या राज्यामध्ये झालेल्या घडामोडीने हैराण होवुन खचलेल्या मनाने हुमायून परिस्थितीशी लढत अमरकोटला राजपुत राजा विरिसालच्या आश्रयास पोहचला. अन् तेथेच हिंदुस्थानच्या या सम्राटाचा जन्म झाला.
आपल्या वडीलांस दिलेलेल्या वचनापोटी आपल्या भावडांची योग्यती व्यवस्था लावून 15 वर्ष यातना व वनवास भोगलेला हुमायुन शाहीपदावर कायम झाला.(@2) पुढे अपघाती जखमी होवून वयाच्या 51 व्या वर्षी हुमायून मुत्यृ पावला. अगदी लहानपणापासून आई-वडीलाच्या प्रेमळ देखरेखीला मुकलेल्या अकबराचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. (@1) शिक्षणाबद्दल उदासिन असलेल्या अकबराबद्दल अबुल फझल लिहतो "अकबराचा पवित्र आत्मा, निष्पाप ह्रदयबाह्यत्कारी शिक्षणाकडे कधीच झुकले नाही." बापाची गादी मिळविण्यासाठी, हिंदुस्थानातील आपले वर्चस्व टिकविण्यासाठी अकबरास फार जिकरीचे प्रयत्न करावे लागले.
बैरामखानाच्या हाताखाली राज्यकला शिकत शिकत, अकबराने हिंदुस्थानांतील विखुरलेले अनेक जातीचे लोक व संस्थानिक राजे यांचे ह्रदय आपल्याकडे कसे ओढून घ्यावे याचा विचार करुन ठेवला होता. मुसलमानी राज्याचा अंमल हिंदुस्थानात सुरु होऊन चारशे पेक्षा जास्त वर्ष झाली, परंतु मुस्लिम राज्यव्यवस्थे बाबत जनमाणसात आपलेपणाची भावना तशी निर्माण झालेली नव्हती. सर्व हिंदुस्थान एका छत्राखाली आणन्यासाठीच्या प्रयत्नातील एक प्रयत्न म्हणून त्यांने हिंदु धर्मीय स्त्रीयांशी लग्ने केलीत. अकबराच्या अनेक बायका होत्या परंतु कर्नल टॉड यांनी (@3) आठ बायकांविषयी आधारपुर्वक उल्लेख केलेला आहे. त्यातीलच एक राजा बिहारीमल यांची मुलगी व जोधपुरच्या राणाची कन्या जोधबाई ह्या दोन्ही हिंदु धर्मातील होत्या. जोधबाई हि जी जहानगीरची आई व युवराजमाता (मार्यामुज्जमानी) म्हणून अकबराच्या जनानखान्यात अग्रस्थानी होती. अकबराचे तिच्यावर फार प्रेम असल्याने (@4) तिच्यासाठी जनानखान्यात एक मंदीर ही बनवले होते.
आपल्या दानधर्मात हिंदु धर्मातील 'तुलादान' या संकल्पनेला महत्व देवून गैरमुस्लिमांवरील (?) आकारला जाणारा जिझियाकर मागे घेणारा इतिहासात अकबरच आढळतो. (@5) आपल्या कारकिर्दीत त्याने सार्वजनिक धर्म उपासनेवरील बंधने उठवित धार्मिक उपासनेच्या अनुषंगाने बांधण्यात येणा-या इमारतींवरील निर्बंध उठविली. अकबराने अर्थवेद, रामायण, महाभारत यांची पर्शियन भाषेत भाषांतरण घडवून आणलित. अकबर सप्तग्रहांची पुजा करी व आपल्या रजपुत राण्यांबरोबर यज्ञयाग व ब्राह्मणोक्त धर्मविधी करीत असे. .(@2) आपल्या दरबारात अकबराने नवरत्नाची नेमणूक केली होती. त्यामधील तानसेन, राजा तोरडमल, राजा बिरबल, राजा मानसिंग हि रत्ने हिंदु धर्मीय होती. राजा बिरबलाने तर त्यास सुर्य उपासनेचे महत्व पटवून देवून अखेर पर्यंत साथ दिली.
शीखांचा उदय तर अकबराचे पुर्वीच झालेला होता. शीख गुरु अमरदास, रामदास व गुरु अर्जुन ह्या तिघांशी अकबराचा परिचय होताच तसेच लाहोरात असताना अकबर अनवाणी पायी चालत जावून शीख गुरु अमरदासांना त्यांच्या मठात भेटला होता. हिंदु धर्माला जवळून पाहिलेल्या अकबराच्या मुलाला म्हणजेच जहागीरास जेव्हा मुली झाल्या तेव्हा त्यांची नावे ही मानबाई, जोधबाई, राठोडबाई अशी ठेवलेली दिसून येतात….
(क्रमशः)
(इतिहासाच्या पाऊलखुणा या ग्रुप करीता #मुसलमानी_रियासत या हॅश टॅग अंतर्गत लिहलेली लेख मालिका)

No comments:
Post a Comment